बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने घटस्फोटासाठी आलेल्या पत्नीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
सवदत्ती तालुक्यातील करीकट्टी गावातील ऐश्वर्या गणाचारी या महिलेवर हा हल्ला झाला असून, ती गंभीर जखमी झाली आहे. बैलहोंगल तालुक्यातील सवंतगी गावातील मुत्तप्पा गणाचारी या तिच्या पतीनेच हल्ला केला असून या घटनेची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
कौटुंबिक कलहामुळे या दांपत्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. घटनेनंतर जखमी महिलेला सवदत्ती येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सदर महिलेला पुढील उपचारांसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले. हा प्रकार सवदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.


