बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरासे यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी दाखवली. बी. शंकरानंद मार्गावर दुचाकी आणि कारची समोरासमोर टक्कर होऊन एक जण जखमी झाला. अपघातानंतर कांही क्षणातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आयुक्तांनी जखमी तरुणाला त्यांच्या सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था करण्याद्वारे एक आदर्श निर्माण केला.
अपघातातील गंभीर जखमीचे नाव गणेशपूर येथील रहिवासी प्रणोष सुरनागी असे आहे. शहरातील बी. शंकरानंद मार्गावर (क्लब रोड) सोमवारी रात्री 9 वाजता प्रणोषा सुरनागी त्यांच्या दुचाकीवरून कंग्राळी खुर्द गावाकडे जात होते.
त्यावेळी समोरून येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
सदर अपघाताची घटना रस्त्यावरून जाणाऱ्या आयुक्त भूषण बोरासे यांच्या निदर्शनास येताच ते त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेच जखमी तरुणाशी संवाद साधून त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या सरकारी वाहनातून त्याला रुग्णालयात नेले. जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी वेळेवर दिलेल्या प्रतिसादाचे आणि मानवतावादी चिंतेचे घटनास्थळी जमलेल्या जनतेने कौतुक केले. पोलिस आयुक्तांचे हे पाऊल त्यांची समाजाप्रती असलेली वचनबद्धता आणि काळजी अधोरेखित करते. त्यांनी संकटात सापडलेल्यांना मदत करून ते केवळ कायदा पाळणारेच नाहीत तर खरे लोकाभिमुख पोलिस अधिकारी आहेत हे सिद्ध केले आहे. त्यांचे हे काम संपूर्ण पोलिस विभागासाठी अभिमानाची बाब आहे.






