बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारकडे प्रस्ताव गेले असून जनतेच्या सोयीचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावात पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले.
“जिल्ह्याच्या विभाजनामुळे जनतेचे प्रश्न सुटू शकतात. आम्ही सर्वपक्षीय आमदारांनी सरकारकडे याबाबत विनंती केली आहे” असे त्यांनी सांगितले.
जारकीहोळी पुढे म्हणाले, “कोणाला बागलकोट जवळ वाटते, कोणाला विजापूर तर कोणाला धारवाड. त्यामुळे जनतेला जे सोयीचे वाटेल, तोच निर्णय सरकार घेईल.” जिल्हा विभागणीचा निर्णय केव्हा घेतला जाईल, हे सरकार वर अवलंबून आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी सिंचन विभागासोबत विविध विषयांवर आढावा घेतला. हिडकल जलाशयातील पाणीपातळी, नद्यांचा प्रवाह, कालव्यांची दुरुस्ती आणि नवीन कामांबाबत चर्चा झाली. हिडकल धरणातून उद्यापासून नदीमध्ये पाणी सोडले जाईल. ग्रामपंचायत अध्यक्ष गंगा पूजन करतील, असेही जारकीहोळी यांनी सांगितले.

धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी वाटपाच्या संदर्भात त्यांनी खुलासा केला की, १ टीएमसी पाण्याची मागणी असली तरी अर्धा टीएमसी पाणी वाटप करण्याचा निर्णय झाला आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच हे शक्य नसल्याचे पत्र दिले होते, मात्र त्याआधीच उद्योग विभागाने काम सुरू केले होते.
या बैठकीला रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, सिंचन विभागाचे अभियंता महावीर गणी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.




