बेळगाव लाईव्ह : वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देणे हे ध्येय असलेला शांताई विद्या आधार हा उपक्रम माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीरित्या सुरू असून सदर उपक्रमाला गुरुप्रसाद कॉलनी येथील रहिवाशांनी आपल्याकडील रद्दी दान करून पुन्हा एकवार सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे
शांताई विद्या आधार उपक्रमा अंतर्गत रद्दी (जुनी वर्तमानपत्रे) आणि भंगार साहित्य गोळा करून विकण्यात येते आणि त्यातून जमा होणाऱ्या निधीतून गरीब वंचित विद्यार्थ्यांना शाळेच्या फी भरण्यास मदत केली जाते. त्या अनुषंगाने शांताई विद्या आधारच्या टीमने आज गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा नगरमधील गुरुप्रसाद कॉलनीला भेट दिली.
जेथील रहिवासी दर दोन महिन्याला रद्दी गोळा करून विद्या आधारला दान करून सक्रियपणे पाठिंबा देत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक मदत मिळाली आहे. आजच्या भेटीदरम्यान माजी महापौर विजय मोरे आणि ज्येष्ठ रहिवासी व्ही.एल. कुलकर्णी यांनी बेळगावातील सर्व रहिवाशांना त्यांची पेपर रद्दी दान करून या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. “जर शहरातील अधिकाधिक लोक पुढे आले तर या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत करता येईल,” असे माजी महापौर मोरे म्हणाले.

याप्रसंगी गंगाधर पाटील, ॲलन विजय मोरे, विनायक बोंगाळे, विश्वास पाटील आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. जुनी कागदपत्रं, वृत्तपत्रे दान करण्याच्या एका साध्या कृतीमुळे मुलाच्या शिक्षणात आणि भविष्यासाठी कसे योगदान देऊ शकते याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे शांताई विद्या आधार हा उपक्रम आहे.
वाढत्या सामाजिक सहभागामुळे ही चळवळ बळकट होत असून अनेकांना आपल्याला मिळालेल्या ज्ञानाची परतफेड करण्यास प्रेरित करत आहे.




