बेळगाव लाईव्ह :शहरातील सरदार हायस्कूल मैदान आणि एपीएमसी मार्केट यार्ड अशा दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये पोलिसांनी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडील 14 हजार 370 रुपये किमतीचा एकूण 710 ग्रॅम गांजा, संबंधित इतर चीजवस्तू, दुचाकी वाहने असा एकूण 51 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आसिफ अब्दुलगणी हुबळीकर (वय 38, रा. गुलजार गल्ली, न्यू गांधीनगर बेळगाव), नागेश मधुकर भगत (वय 34, रा. गरडमजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग महाराष्ट्र) आणि विनायक सुबराव बेन्नाळकर (रा. रामनगर कंग्राळी केएच, ता. जि. बेळगाव) अशी आहेत.
या तिघांपैकी असिफ हुबळीकर हा बेळगाव शहरातील सरदार हायस्कूल मैदानावरील प्रेक्षक गॅलरी शेजारी सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करत होता. याबाबतची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून असिफला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील 12 हजार रुपये किमतीचा 407 ग्रॅम गांजा, 2000 किमतीचा एक मोबाईल फोन, 20 हजार रुपये किमतीची सुझुकी ॲक्नस दुचाकी स्कूटर आणि रोख 270 रुपये असा एकूण 34 हजार 270 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दुसऱ्या घटनेत आरोपी नागेश आणि विनायक हे दोघेही एपीएमसी मार्केट यार्ड येथील कृष्णा ट्रेडर्सच्या शेड शेजारी सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करत होते. याबाबतची माहिती मिळताच एपीएमसी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस. आर. मुत्तत्ती आणि त्यांच्या सहकार्याने छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील 2370 रुपये किमतीचा 250 ग्रॅम गांजा, 15 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्कूटर (क्र. केए 22 एचएस 8509) आणि गांजाशी संबंधित अन्य साहित्य जप्त केले. सदर प्रकरणी एपीएमसी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


