बेळगाव लाईव्ह : साई कॉलनी, अनगोळ येथे सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक करून टिळकवाडी पोलिसांनी त्याच्याकडील 30 हजार रुपये किमतीचा 1 किलोहून अधिक गांजा, एक मोबाईल, रोख रक्कम आणि एक दुचाकी असा एकूण 91 हजार 370 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव प्रीतम विजय कोळेकर (वय 23, मुळ रा. दांडेली ता. दांडेली, जि. कारवार, सध्या रा. 7 वा क्रॉस सदाशिवनगर, बेळगाव) असे आहे. प्रीतम हा काल मंगळवारी अनगोळ साई कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करत होता.
त्याबाबतची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून प्रीतमला रंगेहात पकडले. तसेच त्याच्याकडील 30 हजार रुपये किमतीचा 1.147 किलो गांजा 40 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, 20 हजार रुपये किमतीची जुपिटर स्कूटर, रोख 1370 रुपये आणि गांजाशी संबंधित अन्य साहित्य असा एकूण 91 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
गांजाचे सेवन करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
शहरातील शिवबसवनगर सर्कल धाबा सर्व्हिस रोड येथे सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या दोघा जणांना काल मंगळवारी गस्तीवर असलेले माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल हुळगेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे प्रकाश नामदेव गंगारेड्डी (रा. अंजनीनगर, बेळगाव) आणि फैजल शमशुद्दीन मुजावर (रा. भेंडी बाजार, बेळगाव) अशी आहेत. या दोघांविरुद्धही माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




