कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

0
3
 belgaum

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती या ठिकाणी रुजवताना मराठी भाषेवर अन्याय केला जाऊ नये, एवढी आमची अपेक्षा आहे. तथापि श्री गणेशोत्सवाचे मराठी फलक उतरवून भाषिक तेढ निर्माण करण्याचा, शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न स्वतः प्रशासनच करत नाही ना? अशी शंका येऊ लागली आहे.

प्रशासनाची मनमानी अशीच सुरू राहिल्यास शहराची शांतता बिघडण्यास वेळ लागणार नाही, असे मत मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी व्यक्त केले.

फलक फक्त मराठीत आहे कन्नड शब्द त्यावर नाहीत असे कारण देत महापालिकेकडून काल पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने शहीद भगतसिंग चौकात उभारलेला मराठी फलक हटविण्यात आला. यासंदर्भात रणजीत चव्हाण -पाटील बेळगाव लाईव्हशी बोलत होते. ते म्हणाले की गेल्या आठ दिवसांमध्ये बेळगाव शहरात विशेष करून महापालिकेमध्ये मराठी भाषे विरुद्ध षडयंत्र सरकारने सुरू केले आहे त्या संदर्भात मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे .

 belgaum

कन्नड सक्ती मागे घ्यावी या मराठी भाषिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे त्या पद्धतीने काल सकाळीच म. ए. समितीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली असताना संध्याकाळी पाटील गल्ली, शनी मंदिर येथील शहीद भगतसिंग चौकातील गणरायाच्या स्वागताचा फलक महापालिकेकडून हटवण्यात आला. याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता “फलकावर कन्नड नसल्यामुळे आम्ही तो उतरवत आहोत,” असे सांगण्यात आले. हा प्रकार लक्षात घेता श्री गणेशोत्सव काळात भाषिक तेढ निर्माण करून शहरातील वातावरण प्रशासनच बिघडू पाहत आहे का? अशी शंका येऊ लागली आहे.

माझी प्रशासनाला विनंती आहे की “आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती या ठिकाणी रुजवताना मराठी भाषेवर अन्याय केला जाऊ नये.” कारण या बेळगाव सीमाभागात आम्ही मराठी भाषिक 15 टक्क्याहून अधिक म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आहोत. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने आम्हाला संबंधित सर्व सोयी-सवलती मराठी भाषेत मिळाव्यात असे निर्देश दिलेले आहेत.

तथापी कर्नाटक सरकार आणि प्रशासनाचे धोरण पाहता त्यांना बेळगावमध्ये शांतता हवी का नको? असा प्रश्न पडतो. या पद्धतीने जर कन्नड सक्तीचा प्रयत्न सुरू राहिला तर शहरातील शांतता बिघडण्यास वेळ लागणार नाही असे मी प्रशासनाला सांगू इच्छितो, असे मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील यांनी शेवटी नमूद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.