बेळगाव लाईव्ह: जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी पळवाटा नव्हे तर विद्यार्थ्यांनी वाटा शोधाव्यात असे प्रतिपादन खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते तर व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, दीपक किल्लेकर, संग्राम गोडसे, शितल वेसणे व खजिनदार के.एल. मजूकर उपस्थित होते .
यावेळी बोलताना प्राचार्य पाटील पुढे म्हणाले, आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर न फोडता न्यूनगंड बाजूला ठेवला तर परिस्थितीवर मात करू शकतो त्यासाठी त्यांनी अनेक उद्दाहरणे दिली. स्वप्न थांबेल त्यादिवशी तुम्ही संपाल त्यासाठी स्वप्नांचा ध्यास घेतला पाहिजे.

दहावीतील निधी कंग्रालकर, वेदिका मुचंडी,प्रियाका मरग्गी, युक्ती देसाई, अन्वी पाटील, ऐश्वर्या माणकोजी, प्रसाद मोलेराखी, साधना कुगजी व बारावीतील तन्वी पाटील, सृष्टी आपटेकर, श्रावणी पाटील, अथर्व गौडाडकर, श्वेता बालेकुद्रीकर व आसावरी पाटील यांच्यासह 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळविलेल्या 165 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अरविंद पाटील यांनी तर म.जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीचे पूजन दीपक किल्लेकर यांनी केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन खजिनदार के.एल.मजूकर यांनी केले तर आभार सहचिटणीस संग्राम गोडसे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू पावले, ईश्वर लगाडे, प्रकाश गडकरी, कविता देसाई यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पालक, विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



