बेळगाव लाईव्ह :अवैध धंद्याविरुद्ध विशेषत: गांजासह इतर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा स्तुत्य प्रयत्न करत असल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी आणि माजी मराठी नगरसेविकांतर्फे आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचे अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि सरचिटणीस माजी महापौर सरिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या अन्य पदाधिकारी, सदस्य व माजी मराठी नगरसेविकांनी आज सोमवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयात जाऊन शहर पोलीस आयुक्त बोरसे यांची भेट घेतली.
यावेळी पोलिसांची धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या दृष्टीने चालविलेल्या प्रयत्नांबद्दल पोलीस आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सदर भेटीप्रसंगी चर्चा करताना माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि माजी महापौर सरिता पाटील यांनी पोलीस आयुक्तांना कांही विनंत्या देखील केल्या.
पोलीस प्रशासनाची शहरातील अंमली पदार्थ विरोधी धडक मोहीम अतिशय स्तुत्य आणि शहरवासीयांना दिलासा देणारी आहे. तथापि युवा पिढीचे भवितव्य लक्षात घेऊन गांजा वगैरे अंमली पदार्थ विक्रीच्या जाळ्याचे समूळ उच्चाटन केले जावे. तसेच मच्छे येथील एका नवविवाहितेचा बेंगलोर येथे जो संशयास्पद मृत्यू झाला, त्या प्रकरणातील दोषींवर विशेष करून तिचा नवरा जर दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी.
श्री गणेशोत्सव जवळ येत आहे या उत्सवाच्या कालावधीत निष्कारण मराठी युवकांवर गुन्हे नोंदविले जाऊ नयेत. याखेरीज शहरातील सर्व श्री गणेशोत्सव मंडळांचे श्री गणेश मंडप बंदिस्त न ठेवता खुले ठेवण्याची सक्त सूचना केली जावी. बंदिस्त मंडपामुळे गर्दी होऊन गणेश भक्तांची विशेष करून महिलावर्ग आणि वयस्कर नागरिकांची गैरसोय होते.
रांगेत तासंतास थांबण्याबरोबरच गर्दीमध्ये महिला युवतींची छेड करण्याचे प्रकार घडतात, पाकीटमारांचा सुळसुळाटही वाढतो. हे हे सर्व टाळण्यासाठी श्री गणेश मंडप खुले ठेवावेत जेणेकरून गर्दी टाळून भाविकांना दुरूनही बाप्पाचे दर्शन घेता येईल, असे रेणू किल्लेकर आणि सरिता पाटील यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना सांगितले.




