‘या’ कचऱ्याबद्दल पिरनवाडीवासियांना माजी महापौर मोरे यांचे आवाहन

0
3
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी आणि परिसरातील लोकांनी कृपया आपला घरगुती कचरा डिव्हाईन मर्सी स्कूलच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी फेकू नये. आपला परिसर आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी विशेष करून रस्त्याकडेला घरगुती कचरा फेकून परिसर अस्वच्छ करू नये अशी सूचना आरोग्य विभागाकडून सातत्याने केली जात असते. तथापि याकडे दुर्लक्ष करून पिरनवाडी येथील डिव्हाईन मर्सी स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा टाकला जात असतो. त्यामुळे संबंधित ठिकाणी दुर्गंधीयुक्त स्वच्छतेचे वातावरण पसरलेले असते.

स्वच्छता कर्मचारी दर दोन-तीन दिवसांनी एकदा रस्त्याशेजारी फेकलेल्या कचऱ्याच्या ढिगार्‍याची उचल करून ती जागा स्वच्छ करण्याबरोबरच डीडीटी पावडर टाकून निर्जंतुक करत असतात. त्यावरून तरी आपण या ठिकाणी कचरा टाकू नये याचे भान परिसरातील रहिवाशांना येत नसल्यामुळे संबंधित ठिकाणी पुन्हा कचरा फेकण्याचा प्रकार केला जातो.

 belgaum

याची कल्पना असलेले सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे हे आज सकाळी सदर मार्गावरून जात असताना त्यांना स्वच्छता कर्मचारी रस्त्याशेजारी कचऱ्याची उचल करताना निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी तेथे थांबून स्वच्छता कर्मचाऱ्यांची विचारपूस करून माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी एकदा कचरा हटवल्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचलेला असतो, अशी तक्रार महापौर मोरे यांच्याकडे केली.

स्थानिक रहिवाशी या पद्धतीने वारंवार रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून माजी महापौर विजय मोरे यांनी सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या कष्टाळू स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले.

तसेच सदर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कष्ट त्यांना होणारा त्रास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण लक्षात घेऊन पिरनवाडी व परिसरातील प्रवाशांनी कृपया या ठिकाणी रस्त्याशेजारी कचरा फेकणे बंद करावे.

आपला परिसर आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्याबरोबरच पालिका अधिकाऱ्यांना परिसरात एक मोठा सार्वजनिक कचराकुंडी बसवण्याची आणि कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आणि उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी एकूण कचरा व्यवस्थापन प्रणाली सुधारण्याची विनंती माजी महापौर विजय मोरे यांनी केली. नागरिकांना जबाबदारीने शहर व गाव स्वच्छता मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.