बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत 113 वर्षे जुनी ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व असलेली असून बेळगाव शहराचे ठळक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सदर इमारत न पाडता तिचे जतन केले जावे, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
बेळगाव मधील 113 वर्षे जुनी ऐतिहासिक अशी बेळगाव प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत आपल्या शहराच्या कायदेशीर आणि नागरी प्रवासाचे प्रतीक आहे. शतकाहून अधिक काळापासून ही इमारत उभी आहे. तिचे वारसा मूल्य आणि प्रतिष्ठित अस्तित्व बेळगावच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला शहरवासीयांना ठामपणे वाटते की अशी इमारत पाडणे म्हणजे आपल्या शहराच्या इतिहासाचा आणि चारित्र्याचा एक भाग गमावणे होय.

सदर इमारत सतत सार्वजनिक किंवा संस्थात्मक वापरासाठी पुनर्संचयित आणि जतन केली जाऊ शकते किंवा वारसा केंद्र अथवा सार्वजनिक संग्रह म्हणून पुनर्संचयित करून तिचा वारसा सन्मानित केला जाऊ शकतो, असे अनेक नागरिकांना वाटते. तेंव्हा आपण तातडीने हस्तक्षेप करून ही इमारत पाडण्याची प्रक्रिया थांबवावी.
तसेच वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांच्या फायद्यासाठी या बेळगावच्या ठळक वैशिष्ट्याचे जतन करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी ॲड. अस्मिता देशपांडे, सुनील सानिकोप यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावचे अन्य सदस्य उपस्थित होते.


