बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरु झाला पावसाचे पाणी साचू लागले कि डेंगू सह साथीचे आजार वाढू लागतात दरवर्षी आरोग्य खात्यांकडून डेंग्यू सारख्या आजारांवर जनजागृती केली जाते यंदाही त्याच पद्धतीने प्रशासन जनजागृती करता आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे, यंदा आरोग्य खात्याने जून महिन्यापासूनच दक्षता घेतली आहे. तरीदेखील जिल्ह्यात यंदा गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे २१ तर चिकनगुनियाचे आठ रुग्ण आढळले आहेत.
यंदा गतवर्षपिक्षा अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे, साथीच्या आजारांची भीती वाढली असून आरोग्य खाते सतर्क झाले आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील वसाहर्तीनजीक असलेल्या नाल्यांमध्ये
पावसाचे पाणी साचत असल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य खात्याने जिल्ह्यातील पाच हजार प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरुकता बैठका घेण्याचे
नियोजन केले आहे. सध्या तीन हजार शाळांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या आहेत. त्या बैठकांमध्ये कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. जिल्ह्यातील नगर परिषद,नगर पालिका आणि ग्राम पंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी योग्य प्रकारे दखल घेत नसल्याची खंत आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. अनेकवेळा सूचना देऊनही दुर्लक्ष होत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराभोवती पाणी साचणार नाही याची काळजी लोकांनी घ्यावी. घरी मच्छरदाणीचा वापर करावा. आजाराची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
जिल्हा रोग नियंत्रण अधिकारीडॉ. विवेक होन्नळ्ळी यांनी सांगितले की डेंग्यू आणि चिकुनगुनिया नियंत्रित करण्यासाठी आणि जनतेमध्ये स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि परिचारिका जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाभरात अळ्या सर्वेक्षण करत आहेत. घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. याचबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




