बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनसाठी एल अँड टी कंपनीकडून खोदण्यात येत असलेले रस्ते येत्या 27 ऑगस्ट 2025 पूर्वी म्हणजे श्री गणेश चतुर्थीपूर्वी दुरुस्त करून पूर्ववत व्यवस्थित करावेत, अशी मागणी प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी महापौरांसह मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन महापौर मंगेश पवार आणि महापालिका आयुक्त शुभा बी. यांना सादर केले. बेळगाव शहरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 27 ऑगस्ट 2025 रोजी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. जी देशामध्ये मुंबई आणि पुण्यानंतर फक्त बेळगावमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडते.
दरवर्षी श्री गणेशोत्सव काळात श्री गणेशाच्या दर्शनासाठी आणि विसर्जनादरम्यान शेजारील राज्यांमधून लोक बेळगावात येतात. यंदाचे वर्ष देखील त्याला अपवाद नसणार आहे.
तथापि सध्या एल अँड टी कंपनीने 24 तास पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन घालण्यासाठी शहरातील रस्ते खोदले आहेत. ज्याचा त्रास आणि अडथळा श्री गणेशोत्सव काळात होऊ शकतो.

हे लक्षात घेऊन येत्या 27 ऑगस्ट 2025 पूर्वी खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अणि गणेशोत्सवाच्या दरम्यान लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी, असा तपशील महापौर व महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.




