बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरात अनेक अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पोलीस विभागाचे डीसीपी (गुन्हे) यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
या ठिकाणी काही तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या. बडेकोळमठ हे अत्यंत धोकादायक ठिकाण म्हणून ओळखले जाते. धक्कादायक म्हणजे, गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील अपघातांमध्ये १९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर ८७ जण जखमी झाले आहेत. वाहनचालकांशी संवाद साधताना, अनेकांनी या भागात ब्रेक निकामी झाल्याचा अनुभव सांगितला.

या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्त्याच्या सुधारणेची नितांत गरज आहे, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे. प्राधिकरणाने रस्ता सुधारण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच ते पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे.
जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहनचालकांनी या भागात अत्यंत सावकाश वाहन चालवावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. या संदर्भात वाहनचालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या पाहणी दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक (तांत्रिक) यशवंत, बेळगाव एनएचएआयचे निवासी अभियंता विजेंद्र आणि अशोक कंपनीचे अभियंता नरसिंहमूर्ती उपस्थित होते.


