बेळगाव लाईव्ह :15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेळगावच्या आरपीडी कॉलेज रोडच्या रुंदीकरणात वापरल्या गेलेल्या दोन गुंठे जागेसाठी अखेर भरपाई देण्यात येणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निर्देशानुसार बेळगाव महापालिकेने बाधित जमीन मालकांना एकूण 1 कोटी 84 लाख रुपये देण्यास सहमती दर्शविली आहे.
सदर भरपाई प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण केली जाईल, असे बेळगाव महापालिकेने न्यायालयाला कळविले आहे. आरपीडी रोड रुंदीकरण प्रकरणात तीन कुटुंबांची प्रत्येकी एक गुंठा जमीन रस्त्यासाठी संपादित करण्यात आली. एका कुटुंबाला आधीच सुमारे 1 कोटी रुपये भरपाई मिळाली आहे, तर उर्वरित दोन गुंठे जमिनीसाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.
त्यावर खंडपीठाने एक महिन्यात दोन गुंठे जागेचे संपादन करून भरपाई देण्याचा आदेश बजावला होता. जिल्हाधिकाऱ्यांची आवश्यक मान्यता आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा करूनही प्रक्रिया एका महिन्याहून अधिक काळ लांबल्यामुळे कायदेशीर कारवाई झाली.
आता, उच्च न्यायालय या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करत असल्याने अखेर नुकसानभरपाईचे वाटप होत आहे. ज्यामुळे पीडित कुटुंबांसाठी बहुप्रतिक्षित तोडगा निघाला असून त्यांना 1.84 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे.


