बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव शहर आणि तालुक्यात मांसाहारी पदार्थांच्या विक्रीने चांगलाच वेग पकडला आहे. येत्या शुक्रवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने, मांसाहार वर्ज्य करणाऱ्या खवय्यांनी आताच आपल्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी चिकन आणि मटणाच्या दुकानांवर गर्दी केली आहे.
मंगळवारी सकाळपासूनच शहरातील तसेच ग्रामीण भागातील चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये मांसाहारप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली. चिकन आणि मटणाला प्रचंड मागणी वाढली असून, खेकडे व अंड्यांनाही चांगली मागणी मिळत असल्याचे चित्र आहे. श्रावणात मांसाहार टाळणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने, खवय्यांनी श्रावणापूर्वीच्या या शेवटच्या दिवसांमध्ये (बुधवार आणि गुरुवार) आपल्या पसंतीच्या मांसाहारी पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्यावर भर दिला आहे. यामुळे ‘श्रावण तोंडावर आणि खवय्यांची चंगळ’ असे चित्र बेळगावात पाहायला मिळत आहे.
सध्या ग्रामीण भागात मटणाचा दर ७२० रुपये प्रति किलो तर चिकन २३० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरातही मांसाहाराला चांगली मागणी मिळत असून, विक्रेत्यांना यामुळे मोठा फायदा होत आहे.



