बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्याच्या बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकारी श्रीमती सुजाता बटकुर्की यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बनावट कागदपत्रे आणि ई-स्वत्तू प्रणालीतील गैरव्यवहारांच्या गंभीर आरोपांनंतर जिल्हा पंचायत कार्यालयाने ही कठोर कारवाई केली आहे.
उपायुक्त (विकास), जिल्हा पंचायत बेळगाव यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या संयुक्त अहवालातून ही अनियमितता समोर आली आहे. श्रीमती बी. एस. जयश्री यांच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणे, मालकाच्या परवानगीशिवाय कर स्वीकारणे, आणि सभेत परवानगी न घेताच नमुना ९ आणि ११अ जारी करणे यांसारखे आरोप श्रीमती बटकुर्की यांच्यावर आहेत. अर्जातील त्रुटी, स्थळ पाहणीचा अभाव, ई-स्वत्तू प्रणालीत चुकीची माहिती भरणे, आणि शुल्क न घेता प्रमाणपत्रे वाटप करणे यांसारख्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले आहे.
शिवाय, १४४१ नवीन मालमत्ता नियमबाह्यरित्या तयार करून उतारे वितरित करणे आणि सार्वजनिक जागांवर भूमाफियांना मदत केल्याचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत. या सर्व बाबींमुळे ‘कर्तव्यात कसूर’ केल्याचा ठपका ठेवत, विभागीय चौकशी प्रलंबित असताना जिल्हा पंचायत कार्यालयाने श्रीमती बटकुर्की यांना निलंबित केले आहे.
या निलंबनाच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा पंचायतीच्या या कठोर भूमिकेमुळे भ्रष्टाचारावर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय निलंबनाच्या कारवाईमुळे पुढील चौकशीत आणखी काय सत्य समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


