बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील एका नवविवाहितेने बेंगळुरू येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वाती श्रीधर सनदी (मूळ नाव स्वाती अनंत केदार) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ती मूळची बेळगाव जिल्ह्यातील मच्छे येथील रहिवासी असून, सध्या बेंगळुरू येथील के. आर. पुरम येथे राहत होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत स्वातीचा पती श्रीधर सनदी हा देखील मूळचा मच्छे येथील रहिवासी आहे. तो सध्या बेंगळुरूमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी सेक्टर) कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. स्वाती आणि श्रीधर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
लग्नापूर्वी स्वाती बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात सेवेत होती. स्वातीच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे तो संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
याप्रकरणी स्वातीचे वडील अनंत केदार यांनी बेंगळुरू येथील के. आर. पुरम पोलीस ठाण्यात श्रीधर सनदी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्वातीच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
पतीसह सासरच्या लोकांच्या छळामुळे स्वातीने आत्महत्या केल्याचा मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे परंतु याचा शव विच्छेदन अहवाल आल्या नंतरच हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


