बेळगाव लाईव्ह :इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीसाठी श्रीराम सेनेतर्फे आज मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ‘चलो इंगळी’ आंदोलन छेडण्याच्या तयारीत असलेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
इंगळी येथील घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासह श्रीराम सेनेतर्फे आज ‘चलो इंगळी’ आंदोलन हाती घेण्यात येणार होते
या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवून होते. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय आवरात आगमन होताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतः जातीने मोर्चाला सामोरे गेले.
यावेळी सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून इंगळी येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेसंदर्भात थोडक्यात माहिती देऊन सर्व हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर मोठ्या संख्येने जमलेले श्रीराम सेनेचे कार्यकर्ते ‘चलो इंगळे’ आंदोलनाला सुरुवात करणार होते. तथापि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी प्रमोद मुतालिक यांच्यासह सेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करून ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पोलीस वाहनांमध्ये डांबण्यात येत असल्यामुळे कांही काळ संघर्षात्मक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना तात्पुरती अटक करून ताब्यात घेण्याची पोलिसांची कृती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
कठोर कारवाई करा अन्यथा तुमच्यावरही तीच वेळ येईल -मुतालिक यांचा सरकारला सल्ला
इंगळी मारहाण प्रकरणी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न -मुतालिक यांचा आरोप
हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे श्रीराम सेनेच्या गोरक्षक कार्यकर्त्यांवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अवघ्या चौघा जणांना अटक करून राज्यातील काँग्रेस सरकार आणि पोलीस प्रशासन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केला.
इंगळी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि त्या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज गुरुवारी सकाळी श्रीराम सेनेतर्फे शहरात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी सेनेचे अध्यक्ष मुतालिक बेळगाव लाईव्हशी बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या चार दिवसांपूर्वी हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे तालिबानी गुंडांकडून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व विरोध करण्यासाठी आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी आज आम्ही श्रीराम सेना तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटना येथे एकत्र आलो आहोत. सदर गंभीर घटनेकडे काँग्रेस सरकार दुर्लक्ष करत आहे, दोषींना संरक्षण देत आहे. घटना घडली त्यावेळी 40-50 गुंडांचा जमाव श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारून, दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्याच्या तयारीत होता. मात्र या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी अवघ्या 4 जणांना अटक करून सरकार आणि पोलीस प्रशासन जनतेची दिशाभूल करत आहे. सरकार व पोलीस प्रशासन वेळीच शहाणे झाले नाही तर भविष्यात त्यांच्या बाबतीतही असा प्रकार घडू शकतो. तुम्हालाही एक दिवस झाडाला बांधून मारहाण केली जाईल. तेंव्हा आत्ताच सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने इंगळी येथील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांमध्ये कायदा व पोलीस यांचे भय निर्माण होईल, असे सांगून जर तसे झाले नाही तर संबंधितांना प्रत्युत्तर देण्यास हिंदू समाज सक्षम आहे आणि तेच दाखवण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत असे प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.


