बेळगाव लाईव्ह : बेळगावहून मंगळूरला जाणारी एक खासगी प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटून खड्ड्यात कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात 1 जण जागी ठार तर अन्य 18 प्रवासी जखमी झाले आहेत. अंकोला (जि. कारवार) तालुक्यातील अगसुर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वर आज सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगावहून एक खाजगी प्रवासी बस मंगळूरला निघाली होती. त्यावेळी आज सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कारवार जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील अगसुर गावानजीच्या राष्ट्रीय क्र. महामार्ग क्र. 66 वर चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट तेथील जगदीश धाब्यासमोरील खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य 18 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच अंकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले.
त्यांनी बसमध्ये अडकलेला मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढण्याबरोबरच जखमींना त्वरेने अंकोला सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी मंगळूर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. सदर अपघाताची अंकोला पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


