बेळगाव लाईव्ह :जंगली श्वापदांनी खानापूर तालुक्याच्या विविध भागात थैमान मांडले असून गुंजी येथील सरकारी शाळेच्या आवारात गेल्या आठ दिवसात चार वेळा जंगली अस्वलाचे दर्शन झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वन खात्याने अस्वलांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
खानापूर तालुक्यातील गवाळी येथील शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या टेबलावरच सापाने ठिय्या मांडल्याची घटना ताजी असताना आता गुंजी गावातील सरकारी शाळेच्या परिसरात जंगली अस्वलाचा वावर सुरू झाला आहे. परिणामी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडे शाळेजवळच्या हनुमान मंदिरात अस्वलाचे दर्शन घडल्यानंतर आता शाळा परिसरात ते दिसू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिक्षकांनी अस्वलाच्या भीतीने “तुमच्या मुलांना शाळेच्या वेळेतच पाठवा, वेळेपूर्वी पाठवू नका. तुम्ही स्वतः मुलांना शाळेत सोडा,” असा संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविला आहे. जंगली अस्वलाच्या सततच्या वावराबद्दल गुंजी गावात चर्चा होत असली तरी त्याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल केली जात नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेतच कोंडून ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
गेल्या आठवड्यापासून दोन अस्वलांचा शाळा परिसरात वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. आधीच शाळा इमारतीला गळती लागून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना आता ही नवी ब्याद उभी ठाकल्याने शिक्षक आणि पालकवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. तसेच वनखात्याने गांभीर्याने लक्ष देऊन गुंजी सरकारी शाळेच्या परिसरात वावरणाऱ्या जंगली अस्वलांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
कारवार जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील जगलबेट वनविभागात येणाऱ्या मिरासकुंबेलीजवळ असणाऱ्या नाणेगाली येथील शेतकऱ्यावर काल मंगळवारी सायंकाळी तीन अस्वलांनी अचानक हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात मारुती मळेकर (वय 50) हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
मारुती मळेकर आपल्या शेताकडून सायंकाळी घराकडे परत येत असताना, अचानक तीन अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मारुती गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी वाहनातून प्रथम रामनगर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जगलबेटचे आरएफओ विनय भट तसेच कर्मचाऱ्यांनी रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमी मारुतीची पाहणी केली.




