बेळगाव लाईव्ह :आयआयटी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार समारंभात भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
पुरस्काराचा स्वीकार करून बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठ समाजाच्या शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना ज्ञान व तंत्रज्ञान देण्यास कटिबद्ध आहे.
जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे नमूद केले. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 361 महाविद्यालयांमधील 1 लाख 72 हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही ज्ञानगंगा व्यवस्थितरित्या पोहोचली पाहिजे हा माझा मानस आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञानमुखी, उद्योगमुखी व समाजमुखी शिक्षण मिळावे यावर आमचा कटाक्ष आहे. विद्यापीठातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा विद्यार्थ्यांच्या विविध गरजांकडे अत्यंत संवेदनशीलतेने लक्ष देत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. उपकुलगुरू प्रा. त्यागराज यांनी विद्यापीठाच्या ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या समर्पित प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, सिंडिकेट सदस्य, शिक्षक परिषदेचे सदस्य आणि सर्व प्रशासकांचे मनःपूर्वक आभार देखील मानले.
आयआयटी मुंबई येथे झालेल्या समारंभात संशोधन सामाजिक सेवा प्रशासन व पर्यावरण संरक्षण यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री किरण कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आजपर्यंत कर्नाटकातील केवळ दोन विद्यापीठांना उपरोक्त प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. उपरोक्त पुरस्काराबद्दल राणी चन्नमा विद्यापीठ, (आरसीयू) तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत असून हितचिंतकऱ्यांकडून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.


