बेळगाव लाईव्ह : बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या दुरावस्थेने आणखी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे. आजपर्यंत या रस्त्यावर अपघातात बळी गेलेल्यांची संख्या गेल्या 20 वर्षांत 520 इतकी झाली आहे या रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मांडेदुर्ग येथील शिवांजली विशाल शहापूरकर (रा. मांडेदुर्ग) हिचा २१ दिवसांच्या संघर्षानंतर मृत्यू झाला.
या घटनेने संतप्त झालेल्या ढोलगरवाडी येथील प्रा. दीपक पाटील आणि त्यांच्या गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि सरकारला जागे करण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
ढोलगरवाडीकरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चंदगड कार्यालयावरच एक फलक लावून बांधकाम विभागाला थेट सवाल केला आहे: “आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार?” ‘आज त्यांच्या घरातील एक जीव हकनाक गेलाय, उद्या ही वेळ आपल्या कुणावर तरी येऊ शकते.
आताच जागे व्हा,’ असा भावनिक संदेशही या फलकावर लिहिण्यात आला आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मांडेदुर्गची शिवांजली शहापूरकर हिचा २० जून रोजी कुद्रेमणी फाट्यावर खड्डा चुकवताना भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर ती २१ दिवस बेळगावातील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती, परंतु अखेर तिची प्राणज्योत मालवली.
शिवांजलीला वाहिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या भीषण दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता तरी बांधकाम खात्याला जाग येणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. याच दरम्यान, आज चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात बेळगाव महामार्गासाठी निधीची तरतूद करावी, असा मुद्दा मांडल्याने या प्रश्नावर चर्चांना आणखी उधाण आले आहे.



