बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या योजनांचा आढावा घेणारे एक भव्य प्रदर्शन येत्या ११ ते १३ जून दरम्यान बेळगावात भरवले जाणार आहे. या कालावधीत बेळगावात एक विशेष माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली आणि कार्यक्रमाची माहिती दिली.
खासदार शेट्टर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली असून, गेल्या अकरा वर्षांत त्यांनी देशाला स्थिर आणि पारदर्शक प्रशासन दिले आहे. त्यांना जनतेने पुन्हा विश्वास दिला, हे त्यांच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.
या प्रदर्शनात केंद्र सरकारकडून राज्यासाठी मंजूर झालेल्या योजनांची माहिती, अनुदानाचे तपशील आणि त्याचा लाभ घेणाऱ्या क्षेत्रांची माहिती मांडली जाणार आहे. कर्नाटकात प्रथमच केंद्र आणि खासदारांच्या विकासकामांचे असे सार्वजनिक सादरीकरण बेळगावात होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”
सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराच्या विकास प्रकल्पाच्या श्रेयावरून सुरू असलेल्या वादाला उत्तर देताना शेट्टर म्हणाले की, “मंगला अंगडी खासदार असताना केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. निविदा प्रक्रिया सुरू होती. याशिवाय आणखी काही योजनांतून केंद्राकडे मोठ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याचबरोबर, श्रेय घेण्यासाठी राजकारण न करता प्रत्यक्ष विकासाला महत्त्व द्यावे, हीच आमची भूमिका आहे,” असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना प्रत्युत्तर दिले.

बंगळूरुतील चेंगराचेंगरी प्रकरणावर टीका करताना शेट्टर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या घटनेत ११ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून, यास जबाबदार पोलीस अधिकारी नव्हे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी सल्ला न ऐकता श्रेयासाठी कार्यक्रमावर हट्ट धरला. त्यामुळेच हा प्रकार घडला. अशा बेजबाबदार नेतृत्वाला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी दोघांनीही तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, मुरुघेंद्रगौडा पाटील, वकील एम.बी. जिरली, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, गीता सुतार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.