बेळगाव लाईव्ह :देश सेवा करण्याकरिता भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे अग्निपथ योजनेअंतर्गत सुरुवातीचे 22 आठवड्यांचे कठोर आणि परिवर्तनशील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 1634 अग्निवीरवायू पुरुष आणि महिलांच्या 5 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज शुक्रवारी सकाळी शिस्तबद्धरीत्या मोठ्या दिमाखात पार पडला.
सदर दीक्षांत सोहळ्याच्या प्रारंभी सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूल परेड मैदानावर परंपरांसह अग्निविरवायू यांचे शानदार परेड अर्थात पथसंचलन पार पडले. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे तथा पुनरावलोकन अधिकारी एअर व्हाइस मार्शल पीसीपी आनंद (वरिष्ठ अधिकारी-प्रशासन-प्रशासन, एचक्यूटीसी आयएएफ) यांनी निर्दोष सराव आणि अग्निवीरवायूंच्या उत्साही कामगिरीचे कौतुक केले.
एअर व्हाइस मार्शल आनंद यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार विजेत्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.
यावेळी एजीव्हीटी श्वेता यांना ‘शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट’, एजीव्हीटी क्रिश परगाई यांना ‘जीएसटीमधील सर्वोत्कृष्ट’, एजीव्हीटी आशिष कुमार यांना ‘सर्वोत्तम निशाणाबाज’ आणि एजीव्हीटी यांना ‘सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे एअर व्हाइस मार्शल पीसीपी आनंद यांनी जागतिक सुरक्षा आव्हानांच्या सतत बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर अग्निवीरवायू प्रशिक्षणार्थींना सतर्क, जुळवून घेत आपल्या कर्तव्यांशी वचनबद्ध रहा, असे आवाहन केले. त्यांनी तरुण योद्ध्यांना सतत शिकण्यास, नवीन आव्हाने स्वीकारण्यास आणि सतत विकसित होणाऱ्या जागतिक सुरक्षा वातावरणात मोहीम सज्ज राहण्यास प्रोत्साहित करून अनुकूलतेच्या महत्त्वावर भर दिला. सेवेअंतर्गत आणि बाहेरील जगातील आपल्या आचरणात सचोटीचे सर्वोच्च मानके राखण्याचे आवाहनही एअर व्हाइस मार्शल आनंद यांनी केले.
सदर दीक्षांत सोहळा अग्निवीरवायूंच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा आणि भावनेचा क्षण असल्यामुळे ते या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुनरावलोकन अधिकारी एअर व्हाइस मार्शल आनंद यांनी पालकांचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानले आणि एरोस्पेस डिफेंडर्सच्या पुढील पिढीला घडवण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण पाठिंब्याची कदर केली.
तसेच त्यांनी तरुणांना कुशल आणि लवचिक अग्निवीरवायूंमध्ये घडवून, रूपांतर करून त्यांना सन्मान, धैर्य आणि वचनबद्धतेने राष्ट्राची सेवा करण्यास सिद्ध केल्याबद्दल एअर ऑफिसर कमांडिंग आणि एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून समारोप केला.