बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यांमध्ये पडणाऱ्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या तालुक्यांमधील सर्व सरकारी/अनुदानित/विनाअनुदानित शाळा, पदवी पूर्व महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना उद्या गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मुलांच्या हितासाठी उद्या 26 जून रोजी शाळांना सुट्टी जाहीर करावी या बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापूर आणि कित्तूर विभागाच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उद्या गुरुवार दि 26 जून 2025 रोजी बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापूर आणि कित्तूर तालुक्यांमधील सरकारी/अनुदानित/विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आणि पदवी पूर्व महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा आदेश जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे आज बुधवारी बेळगाव शहर व तालुक्यासह खानापूर तालुक्यातील शाळा व पदवी पूर्व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र पावसाची मुसळधार थांबली नसल्यामुळे आता उद्या गुरुवारी देखील बेळगाव जिल्ह्यातील बेळगावसह खानापूर व कित्तूर तालुक्यातील शाळा महाविद्यालये बंद असणार आहेत.
बुधवारी ही सकाळपासूनच बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनांना संभाव्य परिस्थिती लक्षात घेता बेळगाव खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील अंगणवाडी, सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा, पीयुसी कॉलेज ना सुट्टी देण्यात आली आहे.


