बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकींच्या चोरीपासून ते एटीएममधून रोकड लंपास करण्यापर्यंत आणि घरातून सोन्याचे दागिने चोरण्यापर्यंतच्या घटनांनी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
जाधव नगर येथील रहिवासी गजानन चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, केएलई रुग्णालयामागे असलेल्या कॅन्सर रुग्णालयासमोर आपली होंडा ॲक्टिव्हा स्कूटर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर शहरातील तानाजी गल्ली येथेही दुचाकी चोरीची घटना घडली असून सूरजसिंग रतनसिंग रजपूत यांनी त्यांचा मित्र अमित सुनील खानदाळे यांच्या मालकीची रॉयल एनफिल्ड बुलेट दुचाकी तानाजी गल्लीतील घरासमोर पार्किंगमध्ये लावली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे.
यासोबतच चोरट्यांनी आता बँकांनाही लक्ष्य केले असून उद्यमबाग येथील बेळगाव इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह बँकेतून एक्साइड कंपनीच्या चार बॅटरीज चोरून नेल्याची तक्रार शाखा व्यवस्थापकांकडून करण्यात आली आहे. या चोरी प्रकारणांसहित टिळकवाडी परिसरातूनही सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.


घोळप्पा बसलिंगप्पा होसमनी यांच्या घरातून ५० ग्रॅम वजनाच्या, अंदाजे ४,००,००० रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. या चोरीप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला असून, टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिक धास्तावले असून, पोलिसांनी यावर तातडीने कठोर कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


