बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या स्वयंघोषित कर प्रणाली अंतर्गत घरपट्टीवर 5 टक्के सवलत देण्याच्या योजनेचा कालावधी उद्या सोमवारी 30 जून रोजी समाप्त होणार असून मंगळवारी 1 जुलैपासून घरपट्टीवर 2 टक्के दंड आकारणी सुरू होणार आहे.
बेळगाव शहरांमध्ये स्वयंघोषित कर प्रणाली अमलात आणली जाते या कर प्रणाली अंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात घरपट्टी भरल्यास पाच टक्के सवलत दिली जाते त्यानुसार यंदाही दि. 1 ते 30 एप्रिल या काळात घरपट्टीवर पाच टक्के सवलत देण्यात आली तथापि या सवलतीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी बेळगाव महापालिकेसह राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी नगर विकास खात्याकडे केली होती.
त्या मागणीची दखल घेत नगर विकास खात्याने 5 टक्के सवलतीला दोन महिने मुदतवाढ दिली होती. ही दोन महिन्याची मुदत उद्या सोमवार दि. 30 जून 2025 रोजी पूर्ण होणार असून मंगळवारी 1 जुलैपासून घरपट्टीवर 2 टक्के दंड आकारणी सुरू होणार आहे.
त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्याला दंडाची ही रक्कम प्रत्येकी 2 टक्के इतकी वाढणार आहे. त्यामुळे शहरातील ज्या मिळकतधारकांनी अद्याप घरपट्टी भरलेली नाही त्यांना 5 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उद्याचा एकच दिवस मिळणार आहे.


