तानाजी गल्लीतील फाटक बंदीवरून संतापाची लाट

0
7
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील तानाजी गल्लीजवळील रेल्वे फाटक गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद करून दोन्ही बाजूंनी भिंत उभारण्यात आली आहे. यामुळे तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली, महाद्वार रोड या परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.

रोजंदारी करणारे कामगार, नोकरदार वर्ग, विद्यार्थी, व्यापारी, महिलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच लांबचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास हे सगळे सोसावे लागत आहेत. रस्ता बंद झाल्यामुळे रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना गंभीर अडचणी येत असून, वेळेवर उपचार मिळणं अवघड झालं आहे. याशिवाय, दोन्ही बाजूंना शाळा असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी ताण सहन करावा लागत आहे. विशेषतः सणाच्या मिरवणुकीच्या काळात फाटक बंदमुळे मिरवणुकांचाही मार्ग विस्कळीत होणार आहे. परिणामी सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांनाही अडथळे निर्माण होणार आहेत.

ज्यावेळी भिंत उभारली जात होती, त्यावेळी नागरिकांशी कोणताही संवाद झाला नव्हता. सर्वेक्षण झाल्याचेही अनेकांना माहिती नव्हते. काही मोजक्या लोकांनी ‘येथे ब्रिज नको’ म्हणत सह्या दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बहुसंख्य नागरिकांशी चर्चा न करता अचानक फाटक बंद करण्यात आले, यामुळे सर्व स्तरांवर नाराजी आहे. फुलबाग गल्ली, महाद्वार रोड, भांदूर गल्ली, तानाजी गल्लीतील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले असून, भिंत हटवून रस्ता खुला करावा किंवा त्वरित अंडरब्रिज किंवा फुटब्रीज उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

 belgaum

व्यवसायावर मोठा परिणाम झाल्यामुळे व्यापारी वर्गही चिंतेत आहे. दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकांना पर्यायी मार्ग नाही, परिणामी आर्थिक फटका बसत आहे. फाटक पूर्ण बंद करू नका, पर्यायी रस्ता तयार करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, आता प्रशासन आणि रेल्वे विभागाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन, त्यावर योग्य तोडगा काढावा, अन्यथा या प्रश्नाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.