बेळगाव लाईव्ह : चोर्ला घाटात रस्त्यालगत सुमारे ६० फूट खाली दरीत एक मोठी संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच ‘फेसबुक फ्रेंड्स सर्कल’च्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
घडलेली घटना गंभीर असू शकते हे लक्षात घेऊन, अवधूत तुडवेकर यांनी आपल्या मित्र संतोष दरेकर आणि पद्मप्रसाद हुळी यांच्यासह तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी लगेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक भीमशंकर गुळेद यांनाही याबाबत अवगत करण्यात आले. माहिती मिळताच, खानापूर पोलिसांचे एक पथक तातडीने चोर्ला घाटात पोहोचले. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल के.व्ही. कुलकर्णी, सहाय्यक उपनिरीक्षक एन.के. पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते परशुराम चव्हाण यांचा समावेश होता.

सहाय्यक उपनिरीक्षक एन.के. पाटील आणि टीम सदस्य पद्मप्रसाद हुळी यांनी धाडसाने दरीत उतरून बॅगेची पाहणी केली. बॅग उघडताच तीव्र दुर्गंधी पसरली. तपासणीअंती बॅगेत ‘शेळीचे मांस’ असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, हे मांस सुमारे २ ते ३ दिवसांपूर्वी तिथे टाकले असावे असा अंदाज आहे. चोर्ला घाट हा बेळगाव ते गोवा जोडणारा एक महत्त्वाचा आणि प्रसिद्ध पर्यटन मार्ग असल्याने, बॅगेतील वस्तूंच्या स्वरूपाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या घटनेमध्ये तात्काळ आणि जबाबदारीने कार्यवाही केल्याबद्दल ‘फेसबुक फ्रेंड्स सर्कल’ने खानापूर पोलिसांचे, विशेषतः सहाय्यक उपनिरीक्षक एन.के. पाटील यांचे, आणि इतर सर्वांचे आभार मानले आहेत.


