गरिबांसाठीचे गाळे श्रीमंतांना.. RTI मधून माहिती समोर

0
4
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील खाऊकट्टा गाळ्यांच्या वाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाले असून, गरीब आणि गरजू लोकांसाठी असलेले हे गाळे बेकायदेशीरपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महापौर आणि एका नगरसेवकाने घेतला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुं यांनी केलाय या संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीतून वरील माहिती देखील बाहेर पडली आहे.

या प्रकरणी दोन्ही लोकप्रतिनिधींना अखेर अपात्र घोषित करण्यात आले आहे, आरटीआय माहिती संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाऊकट्टा प्रकल्प स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गरीब, विधवा महिला आणि सैन्यदलातील कुटुंबांना आधार देण्यासाठी तयार केला होता, असे परिपत्रकात स्पष्ट नमूद होते.

मात्र, या प्रकल्पात अनेक धनाढ्य लोकांनी बेकायदेशीरपणे गाळे घेतले. विशेषतः, महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधीशी संबंधित आहेत, त्यांनी हे गाळे घेतल्याचा आरोप मुळगुंद यांनी केला आहे. हे गाळे दक्षिण भागाच्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखालीच घेण्यात आले असल्याचा मुळगुंद यांचा आरोप आहे.

 belgaum

माहिती अधिकार कायद्याखाली प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक स्थिती आणि माहिती दडपल्याचा आरोप सुजित मुळगुंद यांनी केला आहे. माहिती हक्क आणि अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार महापौर मंगेश पवार यांची संपत्ती लक्षवेधी आहे. त्यांच्याकडे ६,२०,००० रोख रक्कम, ८०,००० बँक ठेव, ५०,००० किमतीची दुचाकी, तसेच ३,६०,००० किमतीचे १६ तोळे सोने आणि १२ तोळे चांदी आहे. याशिवाय, नाझर कॅम्प वडगाव येथे त्यांचे स्वतःचे घर आहे. एकूण पाहता, त्यांची अंदाजित संपत्ती २०,६०,००० अधिक स्वतःचे घर अशी आहे.

नगरसेवक जयंत जाधव यांच्याकडे ८५,००० रोख रक्कम, बँकांमध्ये ४६,८३७ मुदत ठेव, १,५०,००० किमतीची चारचाकी, ३०,००० किमतीची दुचाकी आणि तब्बल २२,००,००० किमतीचे ५५ तोळे सोने आहे. त्यांच्याकडे ५०,००,००० किमतीचे स्वतःचे घर असून, एलआयसी विमा पॉलिसीदेखील आहे. त्यांची एकूण अंदाजित संपत्ती ७५,११,८३७ इतकी आहे. या जाहीर केलेल्या मालमत्तेच्या आकडेवारीवरून हे लोक कोणत्या बाजूने गरीब आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खाऊकट्टा मधील दुकाने गरिबांसाठी असतानाही, दोन्ही नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदेशीरपणे गाळे घेतले. निवडणुकीत मालमत्ता आणि देयके जाहीर करताना त्यांनी ही माहिती लपवली असल्याचा आरोपही मुळगुंद यांनी केला आहे.

या गैरप्रकारानंतर सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर प्रादेशिक आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचे आदेश दिले. या आदेशाला आव्हान देण्यासाठी दोन्ही नगरसेवक नगरविकास सचिवांकडे गेले, मात्र त्यांनीही प्रादेशिक आयुक्तांचा आदेश कायम ठेवला. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता, न्यायालयाने स्थगिती देऊन विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आता नगरविकास विभागानेही प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशाला पुष्टी देत दोन्ही नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे. यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे. या घटनेमुळे बेळगावच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.