बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सध्या बसपास काढताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कारण एसटीएस क्रमांक प्रणालीत कार्यरत नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. दररोज बेळगाव शहरात विविध तालुक्यांमधून हजारो विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवास करतात. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय बसपासमुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च कमी होतो. मात्र सध्या ही पासप्रक्रिया अडथळ्यात आली आहे.
बसपास मिळवण्यासाठी आवश्यक असलेला एसटीएस क्रमांक (Student Tracking System) तांत्रिक कारणांमुळे प्रणालीत कार्यरत होत नाही. त्यामुळे ऑनलाइन बसपास प्रणालीवर विद्यार्थ्यांची नोंदणी करता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या समस्येमुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत असून या समस्येबाबत शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासनाने शिक्षण खात्याकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. शिक्षण खात्याने तातडीने परिवहन विभागाशी संपर्क साधून ही तांत्रिक अडचण दूर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
ही समस्या केवळ बेळगाव शहरापुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील इतरही भागांतील शाळांमध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे हा प्रश्न जिल्हास्तरीय पातळीवर गांभीर्याने घेतला जाणे आवश्यक आहे. शिक्षण खात्याने परिवहन विभागाशी त्वरित संपर्क साधून ही तांत्रिक समस्या सोडवावी, अशी जोरदार मागणी शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्था करत आहेत.


