बेळगाव लाईव्ह :संतीबस्तवाड येथे घडलेल्या इस्लामी पवित्र धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी निरपराध सर्वसामान्य लोकांना त्रास देणे थांबवावे. तसेच या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना येत्या बकरी ईद पूर्वी अटक करून कठोर शासन करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगावच्या समस्त मुस्लिम समाजातर्फे देण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
मोर्चाने आज सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी (डीसी) कार्यालय आवारात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या मुस्लिम समाज बांधवांनी सादर केलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारून त्वरेने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन सादर करण्यापूर्वी संतीबस्तवाड प्रकरणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांना माहिती देताना एका मुस्लिम समाज प्रमुखाने सांगितले की, आमच्या पवित्र धर्मग्रंथच्या विटंबनाची निंद्य घटना घडवून आज 20 दिवस होत आले आहेत. मात्र अजूनही गुन्हेगारांना पकडण्यात आलेले नाही. प्रारंभी त्यासाठी तीन दिवसाची आणि पुढे सात दिवसांची मुदत घेतली गेली. त्यानंतर सखोल तपासासाठी वेळ लागत असावा म्हणून आम्ही गप्प बसलो होतो. परंतु आजपर्यंत गुन्हेगारांना पकडण्याच्या बाबतीत ठोस असे काहीच घडलेले नाही. आम्ही आज आंदोलन करणार अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच आमच्या पोलीस आयुक्त साहेबांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन धर्मग्रंथ विटंबनेचे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले आहे.
याचा अर्थ आम्हालाच पोलीस प्रशासनाला झोपेतून जागे करावे लागत आहे असा होतो. संतीबस्तवाड गावामध्ये तीन महिन्यात गुन्हेगारीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. धर्मग्रंथ विटंबनेनंतर या भागाच्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले ही चांगली गोष्ट आहे. आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धर्मग्रंथ विटंबने प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून तपासाच्या नावाखाली संतीबस्तवाड गावातील सर्वसामान्य निरपराध लोकांना त्रास दिला जात आहे. चौकशीसाठी वाट्टेल तेंव्हा रात्री अपरात्री त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे. त्याचप्रमाणे धर्मग्रंथ विटंबनेचा गुन्हा मान्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असून आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही.

खऱ्या गुन्हेगारांना पकडण्या ऐवजी पोलीस निष्कारण गावकऱ्यांना त्रास देत आहेत आणि हे तात्काळ थांबले पाहिजे. तेंव्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे की येत्या बकरी ईद पूर्वी खऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात यावे अन्यथा ईदनंतर यापेक्षाही मोठे आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले.
निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हातात निषेधाचे आणि गुन्हेगारांना गजाआड करावे या मागणीचे फलक घेऊन मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम बांधवांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी अन्य एका मुस्लिम समाज प्रमुखाने प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना पवित्र धर्मग्रंथ विटंबना प्रकरणच्या पोलीस तपासावर कडाडून टीका केली. तसेच सदर प्रकरणात निरपराध लोकांवर अन्याय न करता खऱ्या दोषींवरच कारवाई झाली पाहिजे. यापूर्वीच्या पोलिस आयुक्तांनी सात दिवसात गुन्हेगार गजाआड झाले नाही तर मी राजीनामा देईन असे म्हटले होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली? त्यांच्या अचानक बदलीबद्दलही आम्हाला शंका येत आहे? कुराण, भगवद्गीता, बायबल वगैरे कोणताही धर्मग्रंथ असो त्याची विटंबना किंवा मंदिर मशीद चर्च वरील हल्ला अशा गोष्टी करणाऱ्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे तरच धार्मिक भावना दुखावण्याचे अथवा तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडणार नाहीत.
बलात्कार करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात जामिनावर सोडले जाते मात्र आमच्या पवित्र ग्रंथाची विटंबना करणाऱ्यांना अद्याप पकडण्यात आलेले नाही. याप्रकरणी आमदारांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत आहे असे आम्हाला वाटते आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. मात्र तरीही येत्या बकरी ईद पूर्वी अथवा त्यानंतर एक-दोन दिवसात गुन्हेगार पकडले गेले नाही तर गल्लोगल्ली, प्रत्येक चौकात आम्ही आंदोलन छेडू आणि त्याला जबाबदार प्रशासन असेल, असे त्या समाजप्रमुखाने स्पष्ट केले.