बेळगाव लाईव्ह:हिंदू समाजात अनेक प्रथा, परंपरा असल्या तरी त्यांचे पालन करताना अन्नाची नासाडी करण्याऐवजी सदुपयोग करण्याच्या उद्देशाने वटपौर्णिमे निमित्त वडाच्या झाडासमोर प्रसादासाठी ठेवलेली फळे संकलित करून ती गावातील भुकेल्या गरजू लोकांना वितरित करण्याचा अतिशय स्तुत्य आणि आदर्शवत असा उपक्रम मच्छे गावातील कांही सुहासिनी महिलांनी राबविला.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी काल मंगळवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. मात्र मच्छे गावातील मालती मालोजी लाड, रमा श्याम बेळगावकर, विणा गजानन छप्रे, रेणुका भोमाणी लाड आणि गीता भेकणे या सुहासिनी महिलांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते.
यावर्षी सुद्धा त्यांनी काल दिवसभर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडा समोर ठेवण्यात आलेली फळे एकत्र जमा केली. तसेच पूजेसाठी येणाऱ्या महिलांना वृक्षारोपण व वटवृक्षाचे तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
गेल्या कांही वर्षापासूनच्या उपरोक्त सुहासिनींच्या प्रबोधनामुळे गावातील महिलांमध्ये बऱ्याच अंशी सकारात्मक बदल घडून येत आहेत. काल वटवृक्षा समोर प्रसादरुपी ठेवलेले आंबा, केळी, पेरू, धामण, करवंद, जांभूळ, चिकू आधी रानमेव्यासह विविध प्रकारची फळे संकलित करून मच्छे गाव आणि परिसरातील भुकेल्या गरजू लोकांना वितरित करण्यात आली.

आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रथा परंपरा प्रचलित आहेत. त्या परंपरा जोपासताना आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अन्न हे पूर्ण परब्रम्ह समजून त्याची कोणतीही विटंबना होऊ न देता ते अन्न गरजूंना उपयोगी व्हावं हा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे, असा संदेश मच्छे गावातील महिलांनी आपल्या या विधायक कार्यातून दिलेला आहे.
या कार्यात मालती लाड, रमा बेळगावकर, विणा छप्रे, रेणुका भोमाणी लाड, गीता भेकणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांचा सहभाग होता. हा उपक्रम राबवण्यासाठी ॲम्बिशन युथ अकॅडमीच्या कार्यकर्त्यांचे देखील सहकार्य लाभले आहे.




