बेळगाव लाईव्ह : विकासकामांमध्ये निष्काळजीपणा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे योग्य व्यवस्थापन न करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बेळगावात सेवेला संधी मिळणार नाही, असा सडेतोड इशारा सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. बेळगाव शहरातील त्यांच्या कुवेंपू नगर येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
विकासकामे करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करतो, परंतु प्रत्येक कामाची माहिती मुख्यमंत्री किंवा आम्ही स्वतः देणार नाही. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. विकासकामांत दुर्लक्ष किंवा कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्यास, अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणार नाही. जिल्ह्यात काही घटनांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यानेच पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेते कमल हासन यांनी ‘कन्नड भाषा तमिळमधून जन्माला आली’ या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, कमल हासन यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. कन्नड भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. कमल हासन यांनी कन्नडबद्दल असे बोलल्याबद्दल आधी कन्नड लोकांची माफी मागावी.
हिडकल जलाशयातून धारवाडच्या औद्योगिक क्षेत्राला पाणी नेण्यासाठी तीन विभागांनी आधीच परवानगी दिली आहे. धारवाडच्या कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळद्वारे सुमारे ३५० कोटी रुपये खर्चाचे हे काम असून, सुमारे ११० किमी पाइपलाइनद्वारे धारवाडच्या औद्योगिक क्षेत्राला पाणी नेले जात आहे. मात्र, किती पाणी नेले जात आहे, याची माहिती उपलब्ध नसल्याचे जारकीहोळींनी नमूद केले. या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून भविष्यात आपल्या जिल्ह्याला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळात गैरव्यवहार सुरू असल्याच्या माध्यमांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना, गेल्या दोन केडीपी बैठकांना झोपडपट्टी मंडळाचे अधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाद्वारे सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे स्पष्ट केले.
गृहलक्ष्मी योजनेबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. ‘सरकार उशिरा का होईना, लोकांपर्यंत योजनेचे पैसे पोहोचवत आहे, पण यावरही टीका करणे हीच विरोधकांची मोठी कामगिरी आहे,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर उपरोधिकपणे भाष्य केले. याव्यतिरिक्त, जारकीहोळी यांनी आयपीएल अंतिम सामन्यावरही आपले मत व्यक्त केले. ‘प्रत्येकाला आपला आवडता संघ जिंकावा असे वाटणे स्वाभाविक आहे, त्यामुळे उद्याच्या सामन्यात आपला आरसीबी जिंको!’ असे म्हणत त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आपला पाठिंबा दर्शवला. तसेच वैयक्तिक आवडीसंदर्भात बोलत आपण आजही वेळ मिळाल्यास क्रिकेट खेळतो असे जारकीहोळी म्हणाले.