बेळगाव लाईव्ह :संतीबस्तवाड येथील मुस्लिम समाजाच्या ईदगाह तोडफोड प्रकरणी अटक झालेल्या 4 आरोपींना बेळगाव येथील तृतीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी आदिनाथ पाटील यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपींची नावे लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे, मुत्तय्या भरमा उचवाडे, लक्ष्मण नागाप्पा नाईक आणि शिवराज यल्लाप्पा गुडली (सर्व रा. संतीबस्तवाड) अशी आहेत.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, कांही समाजकंटकांनी गेल्या 12 एप्रिल 2025 रोजी संतीबस्तवाड येथील मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळाचे (ईदगाह) मिनार आणि मुस्लिम दफन भूमीतील फरशांची तोडफोड करून धार्मिक स्थळ अपवित्र करण्याबरोबरच मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवला होता.
या संदर्भात स्थानिक मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मोहम्मद गौससाब तहसीलदार यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचा तपास करून भारतीय न्याय संहिता कलम 298 अंतर्गत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
त्याचप्रमाणे लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे, मुत्तय्या भरमा उचवाडे, लक्ष्मण नागाप्पा नाईक आणि शिवराज यल्लाप्पा गुडली यांना संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. या सर्व आरोपींना बेळगाव येथील तृतीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी आदिनाथ पाटील यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर खटल्यात आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. ज्योतिबा पाटील हे काम पाहत आहेत.


