बेळगाव लाईव्ह :संतीबस्तवाड गावातील मशिदीत इस्लामी पवित्र धर्मग्रंथांच्या विटंबनेचे संवेदनशील प्रकरण विशेष आणि अधिक तपशीलवार तपासासाठी अधिकृतपणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले असल्याची माहिती नूतन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार संतीबस्तवाड गावातील नव्याने बांधलेल्या मशिदीच्या तळघरातील प्रार्थनागृहात गेल्या 12 मे रोजी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटक घुसले. त्यांनी कुराणाच्या दोन प्रती आणि अन्य चार पवित्र ग्रंथ लंपास केले.
त्यांनी ते मशिदीच्या पश्चिमेला असलेल्या गुंडोजी नावाच्या व्यक्तीच्या जमिनीत फेकून त्यावर चप्पल टाकून पवित्र ग्रंथ जाळण्याद्वारे त्यांची विटंबना केली. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचा कयास आहे.

मात्र यामुळे सुमारे 5000 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता संतीबस्तवाडचे तहसीलदार मोहम्मद निसार गौससाब यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तसा गुन्हा (क्र. 100/2025) दाखल करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या अनेक कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले.
ज्यामध्ये धार्मिक द्वेष, गुन्हेगारी अतिक्रमण, जाळपोळ आणि पवित्र मालमत्तेची नासधूस यासारख्या गुन्ह्यांसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 329(4), 326(2), 298, 299, 196(1)(ब), 448, 435, 295, 295(2), आणि 153(अ) यांचा समावेश आहे.
प्रारंभी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास हाती घेतला आणि तत्कालीन पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली. तथापि अलिकडेच झालेल्या मार्टिन यांच्या बदलीनंतर नवनिर्वाचित पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर संवेदनशील स्वरूपामुळे आणि निर्णायक प्रगतीअभावी तपास आता अधिकृतपणे सीआयडीकडे सोपवण्यात आला असल्याचे जाहीर केले. सीआयडीचे डीएसपी सुलेमान तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे. चौकशीत सीआयडीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आयुक्त बोरसे यांनी बेळगाव पोलिस आयुक्तालयाकडून दिले आहे.
संतबस्तवाड गाव आणि बेळगाव शहराच्या काही भागात अशांतता निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे सांप्रदायिक सलोख्याबद्दल व्यापक चिंता निर्माण झाली आहे. धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाची गुंतागुंत, तांत्रिक विश्लेषणाची आवश्यकता तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे महत्त्व पोलिस अधिकाऱ्यांनी मान्य केले असून त्यासाठीच तपास अधिक विशेष एजन्सीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सर्व समाजाला शांतता राखण्याचे आणि तपास प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आवाहन केले आहे.


