बेळगाव लाईव्ह :सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एका मनोरुग्ण इसमाला रेल्वेखाली आत्महत्या करण्यापासून रेल्वे पोलीसांनी परावृत्त केल्याची घटना नुकतीच पहिल्या रेल्वे गेट नजीक घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट जवळ एक मनोरुग्ण इसम चक्क रेल्वे रुळावर पहुडला होता.
रेल्वे येण्याची वेळ झाली असताना त्या इसमाने सुरू केलेला हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ टिळकवाडी पोलीस ठाण्याला कळवले.
त्याचप्रमाणे मदतीसाठी आपले सहकारी अवधूत तुडवेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. दरम्यान पहिल्या रेल्वे गेट येथे दाखल झालेल्या पोलिसांना पाहताच त्यांच्याशी हुज्जत घालत, असबद्ध बडबडत तो मनोरुग्ण इसम पलायन करू लागला.
तेंव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. या पद्धतीने पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा जीव वाचवला.


