बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे (एमएलआयआरसी) कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी आज सोमवारी सकाळी सहकुटुंब शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देऊन आश्रमाच्या व्यवस्थापन मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली.
प्रेम, आनंद आणि चांगल्या आठवणींनी भरलेल्या ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या या भेटीप्रसंगी प्रारंभी वृद्धाश्रमातील आजींनी पारंपारिक आरती करून ब्रिगेडियर मुखर्जी यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण वृद्धाश्रम व परिसराची पाहणी केली.
यावेळी तेथील हिरवळ, स्वच्छ परिसर आणि आनंदी वातावरण पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. “आपण यापूर्वी कधीही इतका चैतन्याने भरलेला आनंददायी वृद्धाश्रम पाहिला नव्हता, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी ब्रिगेडियर मुखर्जी यांनी शांताईच्या आजी-आजोबांना केवळ सैनिकांना आशीर्वाद देण्यासाठीच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासही त्यांना आवडेल असे सांगितले.

शांताई वृद्धाश्रमात आश्रयास आलेल्या आजा -आजींची आपल्या सख्ख्या आई -वडिलांप्रमाणे आत्मीयतेने काळजी घेऊन त्यांची आदराने देखभाल करणाऱ्या माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल प्रशंसोद्गार काढून ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ते घेत असलेल्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले.
कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या सदिच्छा भेटीच्या स्मृती प्रित्यर्थ ॲलन विजय मोरे आणि विनायक पाटील यांनी त्यांना अशोक स्तंभ, विशेष शांताई स्मृतिचिन्ह आणि एक पुस्तक देऊन सन्मानित केले. याप्रसंगी शांताई वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापन मंडळाचे अन्य सदस्य, उद्योगपती दिलीप चिटणीस, सिद्धार्थ हुंदरे, पराग चिटणीस, मारिया विजय मोरे, संतोष ममदापूर आदींसह हितचिंतक उपस्थित होता. बेळगावच्या एमएलआयआरसी या लष्कर केंद्राच्या प्रमुखांची ही भेट सैन्य आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांमधील प्रेम व आदराचे एक सुंदर उदाहरण होती.


