बेळगाव लाईव्ह: मराठा समाजात मुहूर्तावर विवाह अन्यथा बहिष्कार असा निर्णय अलीकडे झालेल्या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता त्याचे सर्व थरातून स्वागत झाले होते असे असताना महाराष्ट्रात हगवणे हुंडा बळी प्रकरणानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाने विवाह विषयी अनेक ठराव संमत केले आहेत .
हुंडा देऊ -घेऊ नका, 200 लोकांमध्येच लग्न करा, प्री-वेडिंग बंद करा उधळपट्टी नको वगैरे मुद्दे असलेली मराठा समाजाच्या लग्नाची आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. सदर आचारसंहितेचे पालन बेळगाव मधील मराठा समाजाने देखील करावे, अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तेथील अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सदर आचारसंहिता निर्माण करून जारी करण्यात आली बैठकीत हुंडा पद्धत आणि लग्नातील उधळपट्टी बंद करा, 200 लोकांमध्येच लग्न करा वगैरे 12 मुद्दे आचारसंहितेत नमूद आहेत. मराठा समाजाची लग्नाबाबतची आचारसंहिता पुढीलप्रमाणे आहे. 1) 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करा.
2) डीजे नको पारंपारिक वाद्य आणि लोक कलावंतांना पसंती द्या. 3) प्री-वेडिंग बंद करा, केलेच तर जाहीर दाखवू नका. 4) नवरा -नवरीला हार घालताना उचलून घेऊ नका. 5) कर्ज काढून लग्नामध्ये खर्च करू नका. 6) नवरदेवा पुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना आवरा. 7) लग्नात फक्त वधू पिता आणि वर पिता यांनाच फेटे बांधा. 8) भेटवस्तू ऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख आहेर करा. 9) देखावा करू नका, लग्नात हुंडा देऊ आणि घेऊ नका. 10) इच्छा असेल तर मुलीच्या नावावर कायम ठेव (एफडी) ठेवा.
11) जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नको. 13) लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा. या पद्धतीने महाराष्ट्रात मराठा समाजाच्या लग्नाची आचारसंहिता जाहीर करण्यात आले असून तिची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, बेळगाव शहरासह जिल्ह्यात देखील मराठा समाजात वेळेवर लग्न लागत नसल्यामुळे मित्रपरिवार व नातेवाईकांची पंचायत होते. सध्या लग्न समारंभाचा माहोल असल्यामुळे सर्रास दररोज लग्ने होत आहेत. परंतु एकही लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे दिसून येत आहे. लग्नाचा हंगाम नोव्हेंबर ते जूनपर्यंत चालतो. या कालावधीत बहुतांश लग्न मुहूर्तावर पार पडत नसल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. कांही ठिकाणी तर लग्नाला एक ते दोन तास उशीर होत असल्यामुळे बरीच पाहुणेमंडळी अक्षता टाकायच्या आधीच जेवण करून निघून जाणे पसंत करत असतात.
एकंदर अलीकडे लग्न समारंभात बऱ्याच नवीन प्रथा -परंपरा सुरू झाल्याने लग्नाचे धार्मिक महत्त्व कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर लग्न मुहूर्तावर न झाल्यास 15 मिनिटे वाट पहा. त्यानंतर पै-पाहुण्यांनी जेवण न करता माघारी जावे. त्याच वेळी आपल्या संस्कृतीनुसार वेळेत लग्न करण्याचे महत्त्व वधू-वरांच्या पालकांना समजेल, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अलीकडेच केले आहे. त्या अनुषंगाने आता महाराष्ट्रात जारी झालेली मराठा समाजाच्या लग्नाच्या आचारसंहितेचा आता बेळगावातील मराठा समाजाने देखील अवलंब करण्याची मागणी केली जात आहे.


