बेळगाव लाईव्ह : बेळगावात सार्वजनिक ठिकाणी गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, रोख रक्कम आणि शस्त्र जप्त करण्यात आलं असून, पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद ठरली आहे.
बेळगाव शहरातील आरटीओ ग्राउंड, ऑटोनगर परिसरात अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली. माहितीची शहानिशा करून पीएसआय श्रीशैल हुलगेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ धाड टाकली आणि संशयित सादिक मोहम्मद शरीफ अत्तार याला अटक केली.
पोलीस चौकशीत आरोपीने नफा कमावण्यासाठी गांजाची विक्री करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २५६ ग्रॅम गांजा, २५ हजार रुपयांची दुचाकी, ७०० रुपये रोख रक्कम आणि एक धारदार शस्त्र जप्त केलं. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी माळमारुती पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.


