बेळगाव लाईव्ह :कणबर्गी रस्त्यावरील रामतीर्थनगर कॉर्नर जवळ रस्त्याशेजारी मॅगी नूडल्सच्या पाकिटांचा मोठा ढिगारा टाकण्यात आला असून हा प्रकार कुतूहल व चर्चेचा विषय झाला आहे. तसेच सदर पाकिटे मुदत संपल्यामुळे फेकण्यात आल्याची शक्यता असल्यामुळे जनावरे किंवा मनुष्याने सेवन करण्यापूर्वी त्यांची तात्काळ उचल करण्याची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कणबर्गी रस्त्यावरील रामतीर्थनगर कॉर्नर जवळ कोणीतरी अज्ञात वाहनातून मॅगी नूडल्सच्या पाकिटांचा साठा आणून रस्त्याशेजारी टाकला आहे. मॅगीच्या लक्षवेधी पाकिटांचा रस्त्याशेजारी पडलेला ढिगारा आज शनिवार सकाळपासून साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून कुतूहलाचा विषय बनला आहे.
वापरण्याची मुदत संपल्यामुळे बहुदा सदर मॅगी नूडल्स पाकिटांचा साठा फेकण्यात आला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे कुतूहल व्यक्त केले जात असले तरी मुदत संपलेली सदर मॅगीची पाकिटे मोकाट जनावरांच्या दृष्टीने हानिकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे स्वार्थी लोकांकडून फेकण्यात आलेल्या या मॅगी पाकिटांची उचल करून गैरवापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच मुदत संपलेल्या या पाकिटांमधील मॅगीचे सेवन लोकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या स्वच्छता विभागाने रामतीर्थनगर कॉर्नर जवळ रस्त्याशेजारी टाकण्यात आलेल्या मॅगी पाकीटांच्या ढिगार्याची ताबडतोब उचल करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.





