बेळगाव लाईव्ह :आरसीबी बेंगलोर क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी पंजाब किंग्स संघाला पराभूत करून टाटा आयपीएल करंडक जिंकल्यानंतर काल मंगळवारी मध्यरात्री बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे जल्लोष करत आनंदोत्सवाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या आरसीबी समर्थकांवर सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवण्याची वेळ पोलिसांवर आली.
तब्बल 18 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री आरसीबी बेंगलोर संघाने पंजाब संघाला हरवून आयपीएल करंडक जिंकल्यानंतर देशभरातील विशेषतः कर्नाटकातील आरसीबीच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष करत मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला. या पद्धतीने बेळगावतही आरपीडी कॉर्नर, चन्नम्मा सर्कल वगैरे ठीकठिकाणी आरसीबी क्रिकेट संघाचा विजय सार्वजनिकरित्या साजरा करण्यात आला. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे काल मध्यरात्री मोठ्या संख्येने जमलेल्या आरसीबी संघाच्या चाहत्यांनी जल्लोष करत आपला आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. मात्र अल्पावधीत या आनंदोत्सवाला धुडगुसाचे स्वरूप प्राप्त झाले.
धिंगाणा घालणाऱ्या समर्थकांमुळे परिस्थितीला वेगळे वळण लागत आहे हे लक्षात येताच बंदोबस्तास असलेल्या पोलीस अधिकारी व पोलिसांनी मोठ्या संख्येने जमलेल्या त्या युवा समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांना न जुमानता आनंदोत्सवाच्या नावाखाली उपस्थित समर्थकांच्या जमावाने आपला धिंगाणा सुरूच ठेवल्यामुळे पोलिसांना नाईलाजाने आपल्या लाठ्या हातात घ्याव्या लागल्या.
धुडगूस घालणाऱ्या आरसीबी समर्थकांवर पोलिसांनी सौम्यलाठी मार सुरू करताच चन्नम्मा सर्कल येथे एकच धावपळ उडाली. यावेळी पोलीस आणि समर्थकांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली होती. आपल्या आनंदावर पोलीस विरजण टाकत आहेत असा समज करून घेऊन संतप्त झालेल्या काहींनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार केला.
पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळू लागल्यामुळे पळता भुई थोडी झालेल्या काही समर्थकांवर आपल्या चपला घटनास्थळीच सोडून पलायन करण्याची वेळ आली. आरसीबी समर्थकांच्या धिंगाण्यामुळे सदर मार्गावरील रात्रीची वाहतूक कांही काळ खोळंबली होती. अखेर अल्पावधीत परिस्थिती नियंत्रणाखाली आणून पोलिसांनी राणी कित्तूर चन्नम्मा चौक रिकामा करून वाहतुकीस खुला केला.