बेळगाव लाईव्ह : खानापूर तहसील कार्यालयातील ७/१२ उतारा विभाग आणि जमीन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वेळेवर अनुपस्थित राहण्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कर्मचाऱ्यांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
खानापूर तहसील कार्यालयातील ७/१२ उतारा विभाग आणि जमीन केंद्रातील प्रकरण संबंधित कर्मचारी कार्यालयात वेळेवर न येता उशिरा हजर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
तसेच, कार्यालय अधिकृत वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरु असले तरी संबंधित कर्मचारी ४:४५ किंवा ५:०० वाजताच कार्यालय बंद करून निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे विविध उतारे मिळवण्यासाठी आलेल्या शेतकरी आणि नागरिकांना दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यालयात येण्याची वेळ येत आहे. परिणामी, अनेकांची कामे रखडत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाय, जमीन केंद्रावर अनुभवी कर्मचाऱ्यांऐवजी अनुभवहीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्यानेही कामकाजात अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकऱ्यांनी तहसीलदार डुंडप्पा कोमार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करावी आणि गरज असल्यास कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


