बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसामुळे मूर्तिकाराचे घर कोसळून श्री गणेशच्या सुमारे 100 -125 मूर्तींसह लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना नुकतीच खानापूर तालुक्यातील मेरडा येथे घडली असून नुकसानीतून सावरण्यासाठी संबंधित मूर्तिकाराला दानशूर व्यक्ती, संघ-संस्था तसेच शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त मूर्तिकाराचे नांव तुकाराम परशराम सुतार (रा. मेरडा) असे आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तुकाराम सुतार यांनी गेल्या कांही वर्षांपासून शाडूपासून श्री गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या आगामी श्री गणेश चतुर्थीसाठी त्यांनी 100 -125 श्रीमूर्ती तयार केल्या होत्या.
मात्र गेल्या मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या घराची भिंत आणि छत कोसळून बनविलेल्या सर्व श्री गणेश मूर्ती मातीच्या ढिगाराखाली गाडल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंत तुकाराम यांनी घेतलेली सर्व मेहनत वाया जाण्याबरोबरच सुमारे 125 श्रीमूर्ती आणि घर उध्वस्त झाल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घर कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक तलाठ्यांनी आणि कोल्हापूर स्थित उद्योजक कलाप्पा कृष्णाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. उद्योजक पाटील यांनी जागेवरच सुतार यांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. याप्रसंगी हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील मारुती पाटील, सदस्य रणजीत पाटील, मेरडा पीकेपीएस उपाध्यक्ष पांडुरंग कृष्णाजी पाटील, लक्ष्मण पाटील करजगी गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी तलाठ्यांनी ग्रा.पं. अध्यक्ष सुनील पाटील, सदस्य रणजीत पाटील, पांडुरंग पाटील व पीडीओ निंगाप्पा अक्षी यांच्या समवेत कोसळलेल्या घराची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच पंचनामा करून अहवाल सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती दिली. कौटुंबिक परिस्थिती बेताची असलेल्या मूर्तिकार तुकाराम सुतार यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे त्यांना दानशूर व्यक्ती आणि संघ -संस्थांनी आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन हलगा ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील यांनी केले असून शासनाने देखील मूर्तिकार सुतार यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.


