बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिका आणि रहदारी पोलिसांकडून संयुक्तरित्या बेळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण विरोधात पुन्हा कारवाईला प्रारंभ झाला आहे. समादेवी गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, भेंडी बाजार व पांगुळ गल्ली येथे काल राबविण्यात आलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
महापालिका आणि रहदारी पोलिसांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला समादेवी गल्ली येथून प्रारंभ झाला. त्यानंतर शनिवार खुट, खडेबाजार भेंडी बाजार व पांगुळ गल्लीमध्ये मोहीम राबविण्यात आली.
यापूर्वी समादेवी गल्ली येथे अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली नव्हती. त्यामुळे काल गुरुवारी या गल्लीतून मोहिमेला सुरुवात झाली त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे आढळून आले.
त्यामुळे अतिक्रमण हटाव पथकाकडून साहित्य जप्त करण्यास सुरुवात होताच किरकोळ विक्रेते व व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. खडेबाजार, भेंडी बाजार व पांगुळ गल्लीत अनेकदा मोहीम राबविण्यात आली आहे. तथापि पुन्हा तेथे अतिक्रमण झाल्याचे गुरुवारी कारवाई वेळी निदर्शनास आले.
परिणामी इतक्या वेळा कारवाई करूनही पुन्हा अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी व विक्रेत्यांना कडक इशारा देण्यात आला. कालच्या मोहिमेवेळी व्यापारी विक्रेते आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या.
मोहिमेदरम्यान खडेबाजार येथील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर पार्किंग व बैठ्या विक्रेत्यांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रेखांकन करून पांढरे पट्टे मारण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार अतिक्रमण हटाव मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर केला.





