बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील जेएनएमसी कॉलेज समोर फुटपाथवर दुचाकी व कार गाड्या पार्क केल्या जात असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असून रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
हॉटेल रामदेव येथून डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावर जेएनएमसी कॉलेज समोरील फुटपाथ म्हणजे कार व दुचाकींसाठी पार्किंग स्थळ बनले आहे.
या ठिकाणी एका बाजूच्या संपूर्ण फुटपाथसह रस्त्यावर जवळपास 100 मीटर अंतरापर्यंत दुचाकी वाहने पार्क केलेली असतात.
त्यामुळे पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना नाईलाजाने वाहनांची सततची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते.
यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. तरी रहदारी पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याद्वारे सदर फूटपाथ पादचाऱ्यांसाठी खुला करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.