बेळगाव लाईव्ह :घरे वाटपातील मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारासह अल्पसंख्यांक निवासी शाळेची आवार भिंत आणि जनतेला मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यातील भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या नेते आणि मंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा निधर्मी जनता दलातर्फे एका निवेदनाद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा निधर्मी जनता दलातर्फे अध्यक्ष माजी आमदार मगेन्नावर व अथणीचे माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित राज्यपालांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांनी सांगितले की, कर्नाटकात गेल्या दोन वर्षापासून सत्तेत असलेले काँग्रेस सरकार सर्व आघाड्यांवर संपूर्ण अपयशी ठरले आहे. सर्वसामान्य नागरिक शेतकरी आणि गरिबांसाठी असणाऱ्या घरांच्या बाबतीत जो भ्रष्टाचार होत आहे त्याबाबतीत काँग्रेस पक्षाच्याच बी. आर. पाटील, राजू कागे वगैरे नेतेमंडळींकडून वक्तव्य केली जात आहेत.

खुद्द गृहमंत्री जी. परमेश्वर हे सरकारकडे पैसा नसल्याचे सांगत आहेत. याचा अर्थ असा होतो की हे सरकार जनतेला मूलभूत नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सध्याच्या काँग्रेस राजवटीत भ्रष्टाचाराचा तर कहरच झाला आहे. हा राज्यातील जनतेवर मोठा अन्याय होत असून त्यांचे नुकसान होत आहे. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही निधर्मी जनता दलातर्फे याचा निषेध करतो.
तसेच जनहितार्थ राज्यपालांनी यावर तात्काळ कार्यवाही करावी असे सांगून जे कोण भ्रष्टाचारात सामील आहेत त्यांचा ताबडतोब राजीनामा घेतला जावा. सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी माजी आमदार डोंगरगाव यांनी केली. याप्रसंगी बी. एस. रुद्रगौडा, प्रकाश कणशेट्टी आदींसह बेळगाव आणि चिक्कोडी येथील निधर्मी जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


