बेळगाव लाईव्ह : हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका बसवन कुडची गावातील शेतकऱ्याला बसला असून, शास्त्री गल्ली येथील जिनाप्पा वंडरोटी यांची लाखो रुपये किमतीची म्हैस विजेचा धक्का लागून दगावली. यामुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
जिनाप्पा वंडरोटी यांच्याकडे एकूण सहा म्हशी असून, दररोजच्या सवयीप्रमाणे ते आपल्या म्हशींना चराईसाठी देवराज अर्स कॉलनीकडे नेत असतात. परंतु, घराजवळून थोड्याच अंतरावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांच्या म्हशीला करंट लागला.
आपल्या म्हशीला तडफडून मरताना पाहून जिनाप्पा वंडरोटी यांना खूप दुःख झाले आहे. या घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई हेस्कॉमने त्वरित द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या गेटवरच ट्रान्सफॉर्मर बसविल्यामुळे लहान मुलांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे. नगरसेवक, गावचे पंच आणि शाळेची एसडीएमसी (शाळा व्यवस्थापन समिती) यांनीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर तात्काळ अन्यत्र हलवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
कुडची गावचेच रहिवासी असलेले संजीव हमंणवर हे हेस्कॉम कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत आहेत; मात्र त्यांनीही कधी गावाकडे येऊन या समस्यांची पाहणी केली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आठ दिवसांपूर्वी गावातील महामार्गावर दोन वीजखांब शेतात पडले आहेत, तर देशमीकडे जाणाऱ्या शेतातही तीन खांब कोसळले आहेत. याकडेही हेस्कॉमने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हेस्कॉमच्या या मनमानी कारभाराविरोधात गावकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.


