बेळगाव लाईव्ह :फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पुढाकाराने आणि विविध औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने खानापूर तालुक्याच्या दुर्गम भीमगड वनक्षेत्रातील सुमारे 9 सरकारी शाळांमधील 150 गरजू विद्यार्थी -विद्यार्थिनींना शाळेचे दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य कार्यक्रम आज दुपारी उत्साहात पार पडला.
उद्यमबाग येथील एक्सपर्ट वॉल्वस अँड इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (डीसीपीओ) प्रवीण सैथ आणि सेवानिवृत्त सुभेदार मेजर सुधाकर चाळके उपस्थित होते.
या उभयतांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील जामगाव शाळा, पोटोळी शाळा, घोष शाळा, मेंडिल शाळा, गवळी शाळा, पश्तोली शाळा, कोंगाळा शाळा, सायचल शाळा, मान शाळा या सरकारी शाळांमधील एकूण 150 विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी शाळेचे दप्तर (स्कूल बॅग) आणि व्हया, कंपास बॉक्स वगैरे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

संबंधित शाळांच्या शिक्षकांनी या साहित्याचा स्वीकार केला. याशिवाय, हॉकी बेळगाव संघाला त्यांच्या तंदुरुस्ती आणि यशस्वी कारकिर्दीसाठी 10 योगा मॅट्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे सदस्य, विविध औद्योगिक संस्थांचे मान्यवर, प्रतिनिधी आणि हितचिंतक उपस्थित होते.
सदर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना एक्सपर्ट व्हॉल्व्हज अँड इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनय लोकूर, नवज्योत टेक्नॉलॉजीजचे
व्यवस्थापकीय संचालक अमित नाईक,
महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव आणि आरईसी फ्लो टेक्नॉलॉजीज एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक अमर हाशिलकर यांचे सहकार्य लाभले. उपरोक्त कार्यक्रमानंतर विनायक लोकुर यांनी उपरोक्त उपक्रमाविषयी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.




